औरंगाबाद- कचरा प्रश्नाबाबत महानगरपालिका किती निष्काळजी आहे हे पुन्हा एकदा समोर आलेले आहे. शहरातील घाटी जवळच्या भिंतींवर ‘ग्रीन इंडिया, क्लिन इंडिया’ असे संदेश लिहिले आहेत. मात्र त्याच भिंतींच्या खाली अनेक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. यावरुन ‘स्वच्छ भारत अभियानाचा’ केवळ दिखावा करुन महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्यासोबतच खेळत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न हा सर्वत्र चर्चेचा
विषय ठरला आहे. उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरुन टायफॉईड,
मलेरिया, डायरिया यांसारखे आजार उद्भवत आहेत. मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा करुन
फक्त भिंतींवर संदेश लिहिण्यात समाधान मानले आहे अशी चर्चा सुरु आहे.
विशेष म्हणजे हा साचलेला कचरा घाटीपासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे रुग्णांच्या
आरोग्याशी खेळण्याचा अधिकार महानगरपालिकेला कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित होत
आहे.












